Soybean rate : बदनापूर, जि. जालना : औसा (जि. लातूर) येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे मागील सहा दिवसांपासून सोयाबीनला प्रतिक्विंटल ८५०० रुपये भाव देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषण करीत आहेत.
त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्यावतीने सोमवारी (ता. २३) बदनापूरच्या तहसीलदार अश्विनी डमरे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या टेबलवर सोयाबीन पीक ठेवले. तसेच त्यांना निवेदन सादर करून हा प्रश्न दोन दिवसांत निकाली निघाला नाही तर आम्ही तहसील आणि तालुका कृषी कार्यालय ताब्यात घेऊ, असा इशारा दिला. Soybean rate
यावेळी छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष देवकरन वाघ, जिल्हाध्यक्ष संदीप ताडगे, मराठवाडा कार्याध्यक्ष विलास कोल्हे, युवक जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र घोगरे, किरण चौधरी, ज्योतिराम माने, नानासाहेब जोगदंड, सुरेश जाधव, लक्ष्मण साबळे, कैलास कोल्हे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हातात सोयाबीनचे झाड घेऊन सोयाबिनला ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला पाहिजे, उपोषणकर्त्या विजयकुमार घाडगे यांची प्रकृती बिघडत असून त्यांच्या जिवित्वाला धोका निर्माण झाल्याने शासनाने त्यांच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशा मागण्यां करत तहसीलदार अश्विनी डमरे यांचे कार्यालय गाठले. तिथे त्यांच्या टेबलवर सोयाबीन पिकाचे झाड टाकून त्यांना निवेदन सादर केले. Soybean rate