Loan waiver list : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६ कोटी ७५ लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्र, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक २९ जुलै २०२२ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली. सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये ५० हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. Loan waiver list