कापूस व सोयाबीन अनुदानाचा शुभारंभ अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अनुदान आज (ता.३०) जमा करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी अनुदान वितरणाचा ई शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, आणि इतर मंत्री तसेच कृषी खात्याच्या सचिव जयश्री भोज आदि अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारनं खरीप २०२३ च्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला. परंतु मागील दोन महिन्यापासून शेतकरी अनुदानाची वाट पाहत होते. तर राज्य सरकारकडून तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू होता. अखेर तारीख पे तारीखचा खेळ संपला आहे. अनुदानाच्या पहिल्या टप्प्याचं वितरणाचा ई शुभारंभ मंत्रिमंडळ बैठकी करण्यात आला आहे. कापूस व सोयाबीन अनुदानाचा शुभारंभ
पहिल्या टप्पात किती शेतकरी पात्र ?
राज्यातील ९६ लाख शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र ठरले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ६५ लाख शेतकऱ्यांना अनुदान पहिल्या टप्प्यात देण्यात येईल, असं सांगितलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात अनुदान जमा केले आहे.
अनुदान कधी जमा होणार?
पहिल्या टप्प्यातील अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तर शेतकऱ्याचे कागदपत्र जसजशी जमा होतील आणि आधारचं ई केवायसी पूर्ण होईल तसतसे अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी रविवारी (ता.२९) दिली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डीबीटी पद्धतीने अनुदान जमा करण्यात येणार आहे.