Crop Insurance 2023 : मागच्या वर्षीच्या खरिप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची प्रलंबित नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या काही दिवसांतच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने १ हजार ९२७ कोटी रूपये मंजूर केले आहेत.
खरीप २०२३ हंगामात राज्यात एकूण साधारण ७ हजार ६२१ कोटी रूपये विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते, म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या ११०% पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी ११०% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते.
दरम्यान, नुकसान भरपाईच्या बीड पॅटर्नच्या आधारावर खरीप २०२३ हंगामातील मंजूर ७ हजार ६२१ कोटी पैकी विमा कंपनी मार्फत ५ हजार ४६९ कोटी रूपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी १ हजार ९२७ कोटी नुकसान भरपाई वाटप बाकी होते. Crop Insurance 2023
प्रलंबित नुकसान भरपाई मध्ये नाशिक ६५६ कोटी, जळगाव ४७० कोटी, अहमदनगर ७१३ कोटी, सोलापूर २.६६ कोटी, सातारा २७.७३ कोटी व चंद्रपूर ५८.९० कोटी असे मिळून १ हजार ९२७ कोटी प्रलंबित होते. तर ही रक्कम काल म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंजूर केली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.